
Read in English | हिंदी | বাংলা | தமிழ் | తెలుగు | മലയാളം | ଓଡ଼ିଆ | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | অসমীয়া
रामकृष्ण संघात प्रवेश घेताना विचारले जाणारे प्रश्न
श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र आणि उपदेश यांचा परिचय झाल्यावर अनेक तरुणांच्या मनात रामकृष्ण संघामधील संन्यस्त जीवन स्वीकारण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते. काहींमध्ये वेदान्तावरील एखादे प्रभावी व्याख्यान (कदाचित YouTube वरील) ऐकून संसाराचा त्याग (सर्वसंगपरित्याग) करण्याची इच्छा निर्माण होते. लौकिक यश, संपत्ती आणि नातेसंबंध यांबाबतचा ठोकर खाऊनही यामुळेही अनेक जण मठात येऊ इच्छितात. काही परोपकारी युवक रामकृष्ण संघामधील साधूंच्या निःस्वार्थ सेवेने प्रभावित होऊन स्वतःला संघाच्या सेवाकार्यात समर्पित करू इच्छितात. कोणतेही कारण असले तरी या तरुणांनी संघात प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. अशा भावी संन्याशांना परिपूर्ण निर्णय घेता येण्यासाठी या विषयाचे विवेचन सुस्पष्ट आणि संक्षिप्त प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पुढे देण्यात आले आहे.
१. रामकृष्ण संघ म्हणजे काय?
‘संघ’ म्हणजे एकसमान निष्ठा राखून एकत्र राहणाऱ्या संन्याशांचा गट. रामकृष्ण संघ ही संन्याशांची एक सुनियोजित संस्था आहे. तिची स्थापना श्रीरामकृष्ण आणि त्यांचे अग्रणी शिष्य, स्वामी विवेकानंद यांनी केली. या ठिकाणी श्रीसारदा देवी यांचा उल्लेख अत्यावशक आहे. त्यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व श्रीरामकृष्ण यांच्या बरोबरीचे होते आणि संघाच्या स्थापनेपासून तीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी आईच्या मायेने अनेक आध्यात्मिक उपदेश देऊन संघाला मार्गदर्शन केले. संघामध्ये त्या ‘माताजी’ म्हणून ओळखल्या जातात.
व्यवहारात रामकृष्ण संघ हा रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या दोन नोंदणीकृत संस्थांचा मिळून बनलेला आहे. त्यांचे एकत्र मुख्य कार्यालय बेलूर मठ येथे आहे आणि त्यांच्या जगभरात दोनशेपेक्षा जास्त शाखाकेंद्रे आहेत. या दोन संस्थाचा इतिहास, त्यांचे आदर्श आणि कार्ये या बाबतच्या अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला (www.belurmath.org) भेट द्या.
२. रामकृष्ण संघामध्ये सामील होणे म्हणजे नेमके काय?
रामकृष्ण संघामध्ये सामील होणे म्हणजे आपले कुटुंब, मित्र, व्यवसाय, यश, सर्व सांसारिक इच्छा, सुखोपभोग तसेच व्यक्तिगत सुखदु:खे यांचा परित्याग करणे होय. यापुढे अशी व्यक्ती मठ किंवा आश्रम या नावाने ओळखले जाणाऱ्या मठात आपले आयुष्य व्यतीत करते. ती आपले संपूर्ण आयुष्य आध्यात्मिक साधना आणि निःस्वार्थ सेवेसाठी वाहून घेते.
३. रामकृष्ण संघामधील संन्यासी बनण्यासाठी अनिवार्य अटी कोणत्या?
१८ ते २८ या वयोगटातील किमान पदवीधर असलेले आणि अशी इच्छा असलेले केवळ पुरुष (स्त्रिया नव्हे हे कृपया लक्षात घ्या.) प्रवेशास पात्र असतात. इंजीनियरिंग आणि वैद्यकीय शाखेमधील पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी ३० वर्षे ही वयोमर्यादा आहे. पाश्चात्त्य व्यक्तींसाठी ती ३६ वर्षे आहे. अधिक सखोल माहितीसाठी कृपया बेलूर मठाशी (mail@rkmm.org) संपर्क साधावा.
४. संन्यस्त जीवन जगू इच्छिणाऱ्या युवतींसाठी कोणते पर्याय आहेत?
रामकृष्ण संघ ही संघटना फक्त पुरुषांसाठी आहे. स्त्रियांसाठी श्री सारदा मठ ही समांतर संस्था आहे. तिचे आदर्श देखील रामकृष्ण संघासारखेच आहेत. इच्छुक युवतींनी दक्षिणेश्वर येथील श्री सारदा मठाच्या मुख्यालयाशी संपर्क साधावा. (saradamath.office@gmail.com)
५. मी विवाहित आहे. मी रामकृष्ण संघात सामील होऊ शकतो का?
क्षमस्व. संन्यासदीक्षेसाठी रामकृष्ण संघात फक्त अविवाहित पुरुषांना प्रवेश आहे. घटस्फोटित पुरुषदेखील प्रवेशास पात्र नाहीत.
परंतु आमच्याबरोबर भक्त किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आपले सदैव स्वागतच आहे. यासाठी तुमच्या जवळच्या रामकृष्ण मठाच्या प्रमुखांशी संपर्क साधावा.
६. सर्वस्वाचा त्याग करू इच्छिणाऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची अट का अपरिहार्य मानली आहे?
जरी शैक्षणिक पात्रता ही आध्यात्मिक विकासासाठी पूर्वअट नसली तरी ती पुढील कारणांसाठी आवश्यक आहे –
(अ) संन्यस्त जीवन स्वीकारणे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असतो आणि त्यासाठी मनाची विशिष्ट परिपक्वता आवश्यक असते. इतर सर्व गोष्टींबरोबरच औपचारिक शिक्षणामधून सर्वसाधारणपणे अशी परिपक्वता येण्यास मदत होते.
(ब) रामकृष्ण संघाचे संन्याशी विविध शाळा, महाविद्यालये, दवाखाने आणि इतर संस्था सेवाभावाने चालवीत असतात. त्यांना आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठीय स्तरांवर व्याख्यानांसाठी बोलवले जाते. उत्तम शैक्षणिक पात्रता असल्यास या सर्व बाबी अधिक सक्षमपणे हाताळता येतात.
(क) काही तरुण निराश परिस्थितीतील अखेरचा पर्याय म्हणून संन्यस्त जीवनाचा स्वीकार करताना दिसतात. कदाचित त्यांना अभ्यासाची किंवा परीक्षेची भीती वाटत असते किंवा ते परीक्षेमधील अपयश किंवा अशाच काही त्रुटीमुळे त्यांच्या मनाजोगते काम मिळविण्यात अयशस्वी ठरलेले असतात. चांगली शैक्षणिक पात्रता आणि वयाचे बंधन घातल्याने अशा व्यक्ती संघात येणार नाहीत अशी आशा आम्ही बाळगतो.
७. मी महाविद्यालयात शिकत आहे. मी आताच संघात प्रवेश घेऊ शकतो का?
तुमचे शिक्षण सुरू ठेवून तुम्ही शिकत असलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा हे अधिक योग्य होईल. त्यानंतर लगेच तुम्ही संघात प्रवेश घेऊ शकता. संन्यास घेऊ इच्छिणाऱ्याने एकदम स्वत:च्या शिक्षणाचाच त्याग करू नये!
तुमचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्ही रामकृष्ण मठ-मिशनच्या जवळच्या शाखेच्या संपर्कात राहू शकता आणि तुमच्या मोकळ्या वेळात तिथे स्वयंसेवक म्हणून सेवा देऊ शकता.
८. संघात प्रवेश घेतल्यानंतर मी महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण सुरू ठेवू शकतो का?
मठामध्ये प्रवेश घेण्याआधी आपले शिक्षण पूर्ण झाले असावे अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा असते.
९. माझ्या आरोग्याच्या काही समस्या आहेत. त्यामुळे संघात प्रवेश घेण्यास काही अडथळा येऊ शकतो का?
संन्याशाने इतरांची सेवा करावी, इतरांना संन्याशाची सेवा करायला लागू नये – असे अपेक्षित असल्यामुळे संघात प्रवेश घेण्यासाठी उत्तम प्रकृती असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून उमेदवारास सखोल वैद्यकीय चाचणीस सामोरे जाऊन आपले आरोग्य सिद्ध करणे आवश्यक असते. दीर्घकालीन आणि कमकुवत करणारे शारीरिक किंवा मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना संघात प्रवेश दिला जात नाही. कारण त्यामुळे ते कठोर संन्यस्त जीवन सहन करू शकत नाहीत आणि ते संघासाठी ओझे होऊ शकतात.
१०. मी श्रीरामकृष्ण किंवा स्वामी विवेकानंद यांच्यावरील पुस्तके वाचलेली नाहीत. तरी मी संघात प्रवेश घेऊ शकतो का?
तुम्ही संघात तत्काळ प्रवेश घेणे योग्य होणार नाही. कृपया श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद साहित्यातील निदान काही महत्त्वाची पुस्तके वाचा.
११. मला वेदान्ताचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा आहे. संघात प्रवेश घेतल्यानंतर मी तो करू शकतो का?
हो, संघामध्ये भगवद्गीता आणि उपनिषदे अशा वेदान्तविषयक शास्त्रग्रंथांचा अभ्यास करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. प्रवेश घेतल्यानंतर साधारणपणे तीन वर्षांनी प्रत्येक ब्रह्मचाऱ्याला बेलूर येथील प्रशिक्षण केंद्रात दोन वर्षाचा सखोल अभ्यासक्रम पार पाडावा लागतो [the Probationers’ Training Centre (TC for short)]. येथे वेदान्तासह अनेक विषय शिकविले जातात.
श्रीरामकृष्ण, सारदादेवी, स्वामी विवेकानंद आणि इतर संन्यस्त शिष्यांची जीवने आणि उपदेश हेसुद्धा एका अर्थाने वेदान्ताचेच शिक्षण आहे कारण त्यांनी आपल्या जीवनात वेदान्तामधील सत्यांचा साक्षात्कार करून घेतला होता आणि ते त्यांचे प्रत्यक्षातील रूप होते. त्यांना अनुसरून आपल्या संघामधील संन्याशांना शास्त्रग्रंथांचे शिक्षण, केवळ पांडित्यासाठी नव्हे तर त्यांच्यात दृढविश्वास निर्माण होऊन अखेरीस शास्त्रग्रंथांमधील सत्यांचा त्यांना साक्षात्कार होण्यासाठी, दिले जाते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्र आणि सर्व संघामधील जीवनक्रमात संन्यासी आणि ब्रह्मचारी यांची आध्यात्मिक उन्नती होण्यावर सर्वाधिक भर दिलेला असतो.
१२. मी जन्माने हिंदू नाही. मला संघात प्रवेश मिळू शकतो का?
निश्चितच. रामकृष्ण संघ सर्व धर्म, देश आणि वंश यांमधील व्यक्तींसाठी खुला आहे. फक्त अशा व्यक्ती त्यागमय, पवित्र जीवन जगण्यासाठी तयार असल्या पाहिजेत आणि ‘सर्व धर्म एकाच ध्येयाकडे नेतात आणि मानवसेवा म्हणजे ईश्वर सेवा’ अशा प्रकारच्या श्रीरामकृष्णांच्या शिकवणुकीवर त्यांचा विश्वास हवा.
१३. मी कृष्णाचा (किंवा शिव, काली, ख्रिस्त किंवा इतर एखाद्या देवाचा) भक्त आहे. मी संघात प्रवेश घेऊ शकतो का?
आपले स्वागत आहे! जर तुम्हाला श्रीरामकृष्णांबद्दल श्रद्धाभाव असेल आणि त्यांच्या शिकवणुकीमधील सत्याची तुम्हाला खात्री पटलेली असेल तर तुम्ही संघात प्रवेश घेऊ शकता.
१४. मी माझ्या देशाची, विशेषतः गरीब आणि असाहाय्य जनांची सेवा करण्यासाठी संघात सामील होऊ शकतो का?
हो, जर तुम्ही सेवेची तुमची कल्पना अधिक विशाल करण्यास तयार असाल तर तुम्ही संघात प्रवेश घेऊ शकता. रामकृष्ण संघ ही केवळ सामाजिक सेवा करणारी स्वयंसेवी संघटना (NGO) नाही. ‘आत्मनो मोक्षार्थम् जगद्धिताय च’ (स्वतःचा मोक्ष आणि जगाचे कल्याण साधण्यासाठी) हे आपले ब्रीदवाक्य आहे. आध्यात्मिकता हाच या संस्थेचा मूलभूत आधार, प्रेरक शक्ती आणि सर्वोच्च ध्येय आहे. आमचे संन्यासी समाजसेवा हा त्यांच्या आध्यात्मिक साधनेचा एक भाग मानतात. त्यामुळे संघामध्ये टिकून राहाण्यासाठी असा आध्यात्मिक दृष्टिकोन (केवळ कनवाळू हृदय किंवा देशभक्तीची भावना नव्हे) अपरिहार्य आहे.
१५. मला संन्यासी बनायचे आहे परंतु माझे पालक त्याच्या विरुद्ध आहेत. मी काय करावे?
संघात सामील होण्यासाठी पालकांची परवानगी असणे हे वांच्छनीय असले तरी आम्ही ते अपरिहार्य मानत नाही कारण तुम्ही एक प्रौढ व्यक्ती आहात. पालकांनी त्यांच्या मुलाला संन्यासी बनण्यास प्रोत्साहन देणे हे अत्यंत क्वचित वेळा घडते. बहुसंख्य उमेदवारांना संन्यास या ध्येयासाठी त्यांच्या पालकांचा विरोध किंबहुना क्रोध देखील सहन करावा लागतो. परंतु ‘तुम्ही असे जीवन सांसारिक सुखाविषयीच्या प्रामाणिक तिटकाऱ्यामुळे स्वीकारत आहात, जबाबदारी टाळण्यासाठी नव्हे,’ याची तुम्हाला आतून खात्री असेल तर काहीही तुम्हाला रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे ही देखील वस्तुस्थिती आहे की काही वर्षांनंतर बहुसंख्य पालक मुलाच्या संघात सामील होण्याच्या निर्णयाचे कौतुक करतात आणि अनेकांना आपल्या मुलाचा अभिमानही वाटतो.
घरच्या विरोध आणि अडथळ्यांला तोंड देताना आपण ‘संन्यास ही प्राचीन संस्था आहे आणि ती शास्त्रसंमत आहे’ हे लक्षात ठेवून बळ मिळवू शकतो. ‘आपल्यात वैराग्य जागे होताच जगाचा त्याग करावा’ असे जाबाल उपनिषदात म्हटले आहे. (यदहरेव विरजेत् तदहरेव प्रव्रजेत्।)
१६. मठात प्रवेश घेतल्यानंतर मी माझे पालक आणि नातेवाईक यांच्या संपर्कात राहू शकतो का?
प्रारंभीच्या काळात गरज पडल्यास नवागत ब्रह्मचाऱ्यास पालकांशी बोलण्याची आणि त्यांचे कुशल विचारण्याची परवानगी असते. परंतु अखेरीस संन्याशाने त्याच्या संन्यासपूर्व जीवनामधील सर्व भावबंध सोडून द्यायचे असतात. सर्व जण ही गोष्ट एका दिवसात करू शकत नसल्यामुळे सांसारिक नातेसंबंध हळूहळू कमी करून वैराग्यभाव जोपासायचा असतो.
१७. माझ्या नावावर काही मालमत्ता आहे. मी संघात सामील झाल्यावर तिचे काय होईल?
संन्याशाकडे वैयक्तिक मालमत्ता असू शकत नाही. याबाबत हिंदू धर्मग्रंथ आणि कायदा यांचे यावर एकमत आहे. तुम्ही संघात सामील होण्याआधी किंवा सामील झाल्यावर शक्य तेवढ्या लवकर तुमच्या नावावर असलेल्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेचे तुमच्या इच्छेप्रमाणे हस्तांतरण करून मोकळे व्हायचे असते.
१८. संघामध्ये मला पगार मिळतो का?
संघामध्ये संन्याशांना कोणताही पगार दिला जात नाही. ते संन्यासधर्माच्या विरुद्ध आहे. संन्यस्त जीवनात पगार नसतो. येथे तुम्ही स्वेच्छेने आणि पूर्णपणे तुमचे शरीर आणि मन, तुमची कौशल्ये आणि क्षमता यांचे कोणतीही ऐहिक अपेक्षा न बाळगता समर्पण करता.
१९. संघात प्रवेश घेतल्यानंतर माझ्या वैयक्तिक गरजांची जबाबदारी कोण घेईल? वृद्धावस्थेत मला कोण सांभाळेल?
सर्व गोष्टींबाबत ईश्वरावर पूर्णपणे अवलंबून राहणे हीच संन्यस्त जीवन स्वीकारण्याची पूर्वअट आहे. असे असले तरी संघ तुमची सर्व प्रकारे काळजी घेऊन तुम्हाला आधार देतो. याबाबत चिंतेचे काहीही कारण नाही.
२०. संघात सामील झाल्यानंतर माझा पोशाख कसा असेल?
संघाचे सर्व सभासद कॉलर नसलेला सैलसर कुर्ता, कंबरेभोवती बांधलेले आणि पावलांपर्यंत येणारे धोतर आणि उत्तरीय (खांद्यावर पांघरलेले वस्त्र) परिधान करतात. ब्रह्मचाऱ्यांच्या कपड्यांचा रंग पांढरा असतो आणि संन्याशांसाठी तो भगवा असतो.
२१. मी प्रवेश घेतल्यावर संन्यासी बनण्यासाठी मला किती काळ लागेल?
सर्वसाधारणपणे यासाठी कमीत कमी नऊ वर्षे लागतात. संन्यासाच्या सर्वोच्च व्रतासाठी स्वत:ला घडविण्याकरिता दिलेला हा कालखंड असतो. जेव्हा तुम्हाला संन्यासदीक्षा दिली जाते तेव्हा तुम्हाला ‘आनंद’ याने शेवट होणारे नवीन नाव आणि ‘स्वामी’ अशी उपाधी मिळते.
२२. संघात प्रवेश घेतल्यानंतर मी काय करणे अपेक्षित असते?
संघात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व आयुष्य ‘आत्मनो मोक्षार्थम् जगत् हिताय च’ म्हणजे स्वतःचा मोक्ष आणि जगाचे हित’ या ध्येयासाठी अर्पण करायचे असते. त्यामुळे तुम्ही स्वतःला आध्यात्मिक साधनेला वाहून घेता. आध्यात्मिक साधना म्हणजे जप, ध्यान, प्रार्थना, पूजा, स्तोत्रपाठ-भजने, धर्मग्रंथांचा अभ्यास आणि इतर आध्यात्मिक साधना होत. यामध्ये जप आणि ध्यान अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील काही साधना तुमच्या तुम्हाला करायच्या असतात तर इतर काही मठातील बांधवांच्या सहवासात. या साधनेबरोबरच तुम्हाला तेवढ्याच उत्साहाने आणि प्रामाणिकपणे मठाच्या सेवाकार्यांमध्ये सहभागी व्हावे लागेल. जनसेवा म्हणून करीत असलेले सर्व कार्ये ही पूजेच्या भावनेने करणे अपेक्षित आहे कारण त्यामुळे तुमचे कर्म हेदेखील एक प्रकारची आध्यात्मिक साधना बनते.
अशा प्रकारे दिवस व्यतीत करून तुम्ही साधूंना शोभेलसे पावित्र्य, भक्ती, वैराग्य, नि:स्वार्थीपणा, सत्यवचन आणि ब्रह्मचर्य हे गुण जोपासून ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न कराल.
२३. रामकृष्ण संघामधील आध्यात्मिक साधनेची कोणती पद्धत आहे?
येथे कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग या चारही योगांचा समन्वय आचरला जातो. या योजनेमुळे व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला मदत होते. खरे तर एखाद्याने दृढ श्रद्धा आणि आदर ठेवून आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे जीवन व्यतीत केल्यास तो स्वतःमध्ये या चार योगांचा उत्तम समन्वय करू शकतो. चार योगांमधील समन्वयाचे उत्तम चित्रण स्वामी विवेकानंदांनी बनवलेल्या संघाच्या बोधचिन्हामध्ये केले आहे. आपल्या बोधचिन्हाचे विवरण येथे मिळेल.
२४. मला ब्रह्मचर्याबद्दल अधिक माहिती हवी आहे. याबाबत काही मार्गदर्शक सूचना असलेले लिखाण आहे का?
वेगवेगळ्या स्रोतांमधून एकत्र केलेली स्वामी विवेकानंदांची ब्रह्मचर्यावरची शिकवण येथे दिली आहे.
याखेरीज तुम्हाला पुढील दोन पुस्तकांमध्ये अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन मिळेल:
- Youth! Arise, Awake and Know Your Strength या स्वामी श्रीकांतानंद यांच्या पुस्तकांमधील Strength of Brahmacharya हे प्रकरण वाचा.
- स्वामी अशोकानंद लिखित ‘आध्यात्मिक साधना’ या पुस्तकातील ‘ब्रह्मचर्य’ हे प्रकरण वाचा.
२५. मी संघामध्ये प्रवेश घेतल्यानंतर मला मार्गदर्शन करू शकतील असे कोणी आध्यात्मिक गुरू असतात का?
हो, तुम्ही ज्येष्ठ संन्याशांकडे गेला तर ते तुम्हाला तुमच्या संन्यस्त जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत मार्गदर्शन करतात. तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाहीत यावर देखील ते लक्ष ठेवतात.
२६. मला अजून दीक्षा मिळालेली नाही. मी काय करावे?
मंत्रदीक्षा हा एक पवित्र संस्कारविधी आहे. ज्यात गुरू शिष्याला मंत्र देतात. याखेरीज गुरू त्याला मंत्रजप कसा करायचा आणि ध्यानाची (उपासना) पद्धतही शिकवितात. आपल्या संघामध्ये फक्त संघाचे महाध्यक्ष किंवा उपाध्यक्ष महाराज मंत्रदीक्षा देऊ शकतात. जर तुम्हाला यांच्यापैकी कोणाकडूनही मंत्रदीक्षा मिळालेली नसेल तर तुम्ही संघात प्रवेश केल्यानंतर त्याची व्यवस्था केली जाईल.
२७. मी संघाच्या कोणत्याही शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकतो का?
काही थोडे अपवाद वगळता तुम्ही आपल्या कोणत्याही शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकता.
तुम्ही बेलूर मठामध्ये देखील सामील होऊ शकता. तेथे येणाऱ्या नवागतांसाठी तिथे Pre-Probationers’ Training Centre (PPTC) आहे.
परंतु पूर्वीच नमूद केल्याप्रमाणे तुम्ही कोठेही प्रवेश घेतला तरी तुम्हाला बेलूर मठातील प्रशिक्षण केंद्रात दोन वर्षे व्यतीत करण्याची संधी मिळेल.
२८. बेलूर मठामध्ये प्रवेश घेण्यात काय विशेषता आहे?
बेलूर मठ हे रामकृष्ण संघाचे जणू हृदय आहे. हा रामकृष्ण संघाचा मुख्य मठ आहे आणि येथेच स्वामी विवेकानंद तसेच श्रीरामकृष्णांचे काही संन्यस्त शिष्य राहिले होते. येथेच आपले मुख्यालय देखील आहे. अशा पावन स्मृतींमुळे अनेकांना आपले संन्यस्त जीवन येथूनच सुरू करण्याची इच्छा असते. नवीन उमेदवारांना PPCT येथे सहा ते बारा महिने ठेवल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शाखांमध्ये पाठवले जाते.
२९. माझ्याजवळ एक रामकृष्ण आश्रम आहे. मी तिथे प्रवेश घेऊ शकतो का?
श्रीरामकृष्ण किंवा स्वामी विवेकानंद असे नाव असलेले सर्वच आश्रम या आपली शाखाकेंद्रे नाहीत. त्यामुळे तुम्ही म्हणत असलेला आश्रम रामकृष्ण संघाची अधिकृत शाखा आहे की नाही याची प्रथम खात्री करून घ्या. आपल्या अधिकृत शाखांची यादी बेलूर मठाच्या संकेतस्थळावर (belurmath.org) उपलब्ध आहे.
३०. मला एक विशिष्ट शाखाकेंद्र आवडते. संन्यासी म्हणून मी माझे उर्वरित जीवन तिथे व्यतीत करू शकतो का?
तुम्ही त्या शाखेमध्ये प्रवेश घेऊन जास्तीत जास्त तीन वर्षे तिथे राहू शकता. यानंतर तुम्हाला संघाच्या कोणत्या शाखेमध्ये नेमायचे याचा निर्णय बेलूर मठामधील (जिथे आपले मुख्यालय आहे) वरिष्ठ संन्याशी घेतील.
मुळात आपले संपूर्ण आयुष्य अमुक एका शाखेमध्येच व्यतीत करायचे ही इच्छा संन्यस्त वृत्तीच्या विरोधी आहे. तुम्ही तुमच्या आवडीची शाखा निवडून तेथे सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त तीन वर्षे राहू शकता. त्यानंतर बेलूर मठातील वरिष्ठ संन्याशांच्या निर्णयानुसार संघाच्या कोणत्याही शाखेमध्ये जाण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे.
३१. मला परदेशामध्ये उपदेश करण्याची संधी मिळेल का?
कदाचित मिळेल किंवा मिळणारही नाही. बेलूर मठातील मुख्यालयामधील अधिकारी साधू याबाबत निर्णय घेतात आणि हा निर्णय घेताना ते अनेक बाबी विचारात घेतात. स्वत:च्या समस्त आवडीनिवडींना तिलांजली देऊन आणि केवळ ईश्वराचाच आश्रय घेऊनच रामकृष्ण संघात प्रवेश घेणे उचित ठरेल.
३२. तुम्ही संन्यासाबाबत आणि खास करून रामकृष्ण संघाबद्दल सखोल माहिती देणारी इतर काही पुस्तके सुचवू शकाल का?
प्रश्न क्रमांक १० मध्ये सुचविलेली पुस्तके पुरेशी आहेत. याशिवाय तुम्ही पुढील दोन पुस्तके वाचू शकता:
- The Glory of Monastic Life: by Swami Bhajanananda
- Monasticism – Ideal and Traditions: A Vedanta Kesari Presentation
३३. समजा मला संघामध्ये राहता आले नाही तर मी बाहेर पडू शकतो का?
होय, तुमच्या संन्यस्त जीवनाच्या कोणत्याही क्षणी तुम्ही संघ सोडू शकता. या जीवनात व्यक्ती स्वेच्छेने येतात आणि त्या स्वेच्छेने बाहेरही पडू शकतात. संघ सोडल्यास दोन्ही बाजूंवर कोणतेही आर्थिक किंवा कायदेशीर बंधन नसते! संघ सोडणे म्हणजे तुम्ही आध्यात्मिक मार्ग सोडणे असे मानण्याचीही गरज नाही. तुम्ही जेथे कुठे असाल तेथे तुम्ही साधना सुरू ठेवू शकता.
३४. धन्यवाद. मला माझ्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत. परंतु अजूनही मला मी संघात सामील व्हावे का सर्वसामान्य कौटुंबिक जीवन जगावे याबाबत खात्री वाटत नाही. आपण मला मदत करू शकता का?
याबाबत तुम्हाला स्वतःलाच निर्णय घ्यावा लागेल. आपल्याला आपल्याला खरेच काय हवे आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही तुमचे मन काळजीपूर्वक निरखा. आपले मन सामर्थ्यसंपन्न आणि स्थिर बनविण्यासाठी ईश्वराकडे मनःपूर्वक प्रार्थना करा. तुम्ही थोरामोठ्यांचा सल्ला आणि मत विचारू शकता परंतु अंतिम निर्णय तुमच्या आतूनच आला पाहिजे.